मुंबई : जगभरातील सर्वात आवडत्या सणांपैकी एक म्हणजे ‘ख्रिसमस’. २५ डिसेंबर रोजी हा सण देशभरात आणि जगभरात साजरा केला जातो. भारतीय क्रिकेटपटूंनी देखील हा सण आपल्या खास शैलीत साजरा केला. भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. सुरवातीला हा दौरा भारतीय संघासाठी काहीसा चांगला गेला नाही. एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने भारताला २-१ अशी मात देत भारताचा पराभव केला होता. पण, वर्षाखेरीस भारताने बांगलादेशचा कसोटी मालीकेत २-० असा परभाव करत आपला ख्रिसमस सण साजरा केला व चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले.याशिवाय या मालिकेत सहभागी नसलेले खेळाडूही आपल्या प्रियजनांसोबत या सणाचा आनंद लुटत आहेत.
रोहित शर्मा बनला सांताक्लॉज
भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याने ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज बनून आपल्या मुलीला मोठे सरप्राईझ दिले.
सचिन तेंडुलकरने गरीब मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला
क्रिकेटचा देव व भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने ‘हॅप्पी फीट होम फाउंडेशन’च्या मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला. यावेळी गिफ्ट मिळाल्यानंतर मुलेही आनंदी झाली. यावेळी सचिन तेंडुलकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो मुलांसोबत क्रिकेट आणि कॅरम खेळताना दिसत आहे. सचिनने मुलांसोबत खेळताना त्याचा अनुभवही व्हिडिओमध्ये शेअर केला आहे.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे दुबईत ख्रिसमस सेलिब्रेशन
कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारताचा सर्वात यशसवी कर्णधारांपैकी एक म्हणजे ‘एमएस धोनी’. तो सध्या दुबईत आपल्या कुटुंबासोबत वेल घालवत आहे. त्याची पत्नी साक्षीने एका रेस्टॉरंटमधील व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलीसोबत ख्रिसमस साजरा करताना दिसत आहे. यावेळी एक सुंदर फोटो शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.