सोमवारी (13 मे) आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यावेळी दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. मात्र,पावसामुळं सामना रद्द झाल्यानं याचा खथेट फटका गुजरातच्या संघाला बसला. 1 गुण कमी मिळाल्यानं आता गुजरातचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता असाच काहीसा धोका कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासमोर आहे.
सोमवारी 13 मे रोजी गुजरात विरुद्ध कोलकाताचा सामना पावसामुळं रद्द झाल्यानं गुजरातच्या संघाला केवळ 1 पॉईंट मिळाला. गुजरातला प्लेऑफ्समध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य होतं. मात्र, हा सामना अनिर्णित राहिल्यानं गुजरातचा संघ प्ले ऑफ्समध्ये पोहोचू शकत नाही. आणि आता असाच काहीसा धोका रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघासमोर आहे.
शुक्रवारी 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. प्लेऑफ्ससाठी क्वालिफाय होण्यासाठी बंगलोरला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं अनिवार्य असणार आहे. मात्र, या सामन्यावरही पावसाचं सावट असल्याचं हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलंय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 19 मे दरम्यान बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केवळ पाऊसच नाही तर वादळी वाऱ्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा थेट फटका आरसीबी विरुद्ध सीएसकेच्या सामन्यावर होण्याची शक्यता आहे. आणि याच कारणांतून हा सामना रद्द झाल्यास बंगलोरचं प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं.
प्लेऑफ्सचं नेमकं गणित काय?
सध्या गुणतालिकेवर नजर टाकली तर, चेन्नई सुपर किंग्जचे 13 सामन्यात 14 गुण आहेत आणि जर बंगळुरू विरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर 1 गुण वितरित केला तर त्याचे 15 गुण होतील. अशा स्थितीत त्याला प्लेऑफमध्ये आगेकूच करणे सोपे जाईल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास बंगलोर संघ 13 गुणांवर अडकून राहिल. याचा अर्थ हा संघ थेट प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.