सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचं वार वाहतंय. अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा वार-पलटवार होताना पहायला मिळत असतात. यावेळी अनेकदा भाजपकडून पंतप्रधान मोदी गरीब परिवारातून असल्याचं सांगण्यात येतं. तर अनेकदा मोदींकडे असणाऱ्या महागड्या गोष्टींचे दाखले देत विरोधक त्यांच्यावर टीका करत असतात. मात्र, या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती नेमकी किती असा सवाल अनेकांना पडत असतो. याचंच उत्तर सध्या समोर आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 14 मे रोजी वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यादरम्यान एनडीए आघाडीचे अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षाच्या सर्वात उंच नेत्यासोबत दिसले. या काळात पीएम मोदींनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केल्यानंतर पंतप्रधानांची एकूण संपत्ती किती आहे हे समोर आलंय. मोदींकडे एकुण 52 हजार रुपये रोख आहेत. यानंतर त्यांची स्टेट बँकेत दोन खाती आहेत. यापैकी एक खाते गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे आणि दुसरे खाते वाराणसीच्या शिवाजी नगर शाखेत आहे. पीएम मोदींच्या गुजरात बँक खात्यात 73 हजार 304 रुपये आणि वाराणसीच्या खात्यात फक्त 7 हजार रुपये आहेत. नरेंद्र मोदींची एसबीआयमध्येच एकुण 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपये किंमतीचे फिक्स डिपॉझिट खाते आहे.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्यांचे एकूण वजन 45 ग्रॅम असून त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ना घर आहे ना कोणतीही जमीन. असा परिस्थितीत मोदींची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये इतकी आहे.