मुंबई | कोल्हापूर शहरात गणेश विसर्जनाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हापूर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी अनोखी व्यवस्था केली असून इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारलं आहे. यंत्राद्वारे गणेश मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यात येत आहे. हा वेगळा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असून तब्बल 83 लाख रुपये खर्चून ही यंत्रणा इराणी खण येथे बसवण्यात आली आहे. कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करावं, असं आवाहन यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं आहे. मात्र, यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी कोल्हापूर विसर्जन व्यवस्थेचा हा व्हिडीओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत यावर आक्षेप नोंदवला आहे. याला विसर्जन म्हणत नाही. कोल्हापूर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. नितेश राणे यांनी कोल्हापूर प्रशासनाला सक्त ताकीद दिली असून सदरचा प्रकार वेळेस थांबवण्याची मागणी केली आहे. यावर अद्याप प्रशासनाने किंवा पालिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.