मुंबई | भाजपने केलेल्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांनी चांगलेच उत्तर दिले आहे. किशोरी पेडणेकर यांची याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत बैठक झाली असल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. आता फडणवीस आणि कोश्यारी यांच्या चौकशीचीही मागणी करणार का? असा प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना विचारलाय.
व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे ?
किशोरी पेडणेकर महापौर असताना रऊफ मेमनसोबत बडा कब्रस्तानमध्ये ही बैठक झाल्याचा भाजपचा आरोप आहे. पेडणेकरांसोबत जवळपास २० ते २५ लोक बैठकीला उपस्थित असल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय. रऊफने तोंडाला मास्क लावलाय. पेडणेकर आणि रऊफ यांच्यात काहीतरी गंभीर विषयांवर चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. यावेळी पेडणेकरांसोबत पालिकेचे अधिकारीही उपस्थित असल्याचं व्हिडीओमध्ये प्रथमदर्शनी दिसतंय.
“बारा तोंडं फक्त आरोप करण्यासाठी बसवली आहेत. एका मध्यमवर्गीय महिलेला तरी सोडा. मी कामाने मोठी झाले हो, मी नाही तुमच्यासारखे छक्के पंजे खेळले, माझ्या कामावर तुम्हाला आक्षेप असेल तर मला सांगा, पण हे काय घेऊन बसता, हे फोटो कोणीही काढतं. कोश्यारी किती होशियारी.. माझ्यावर ऑब्जेक्शन घेता? एका स्त्रीवर? राजकारणातील स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक म्हणून पण नाही का सोडणार? सत्ता जरुर मिळवा, पण काम करुन मिळवा, विश्वासार्हता जपून मिळवा, जी शिवसेना, बाळासाहेबांनी मिळवली”, असं पेडणेकर म्हणाल्या.