नागपूरः सध्या धकाधकीचे जीवन, जीवघेण्या स्पर्धेतून जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. यामुळे मुलींच्या लग्नाला होणारा विलंब, पर्यायाने गरंभधारणेस उशीर. त्यात स्तनपान न करण्याची भावनाही बळावलेली. तसेच आनुवंशिकता यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका प्रचंड वाढला आहे. मेडिकलच्या कॅन्सरच्या 2 हजार 300 रुग्णांची नोंद झाली. यापैकी तब्बल 690 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे धक्कादायक निदान पुढे आले.
मेडिकलमध्ये 2021-2022मध्ये 2 हजार 300 नवीन रुग्णांची नोंद झाली. विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये ठेवून उपचार केले जातात. गतवर्षी नोंदणीकृत कॅन्सरच्या रुग्णांपैकी 30 टक्के अर्थात 690 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे आढळले. विशेष म्हणजे असे की, त्यापैकी 10 टक्के म्हणजेच 230 युवती 20 ते 30 वयोगटातील आहेत.
उर्वरित 20 टक्के म्हणजे 460 महिला या तिशीनंतरच्या आहेत. ब्रेस्ट कॅन्सरसाठी वय, कॅन्सरचा पूर्वेतिहास, परिवारात कुणास असेल वा आनुवंशिकता, किरणतोत्सार प्रादुर्भाव, लठ्ठपणा, लवकर पाळी येणे, उशिरा रजोनिवृत्ती, उशिरा गर्भधारणा होणे, स्तनपान न करणे, रजोनिवृत्तीनंतरची हॉर्मोनल थेरपी, मद्यपान या बाबी कारणीभूत असतात. वयाच्या 35 नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे. कॅन्सरची जोखीम असेल तर वयाच्या पंचेविशीनंतर मॅमोग्राफी करणे हितावह आहे. असे रेडिओथेरपी विभाग प्रमुख डॉ. अशोक कुमार दिवाण यांनी सांगितले.