पुणे | शहरात सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते, वाहतूक, ड्रेनेज व्यवस्था यांच्या गैरसोयीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने याचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या समोर खरीखुरी बोट वल्हवत ‘बोट दाखवा,बोट थांबवा’ हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले.
शहरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साठले आहे. त्यातच अनेक ठिकाणी महापालिकेच्या वतीने खोदकाम करण्यात आले आहे. त्या खड्ड्यांमध्येही पाणी साठले असून भविष्यात येथेही एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आहे.
यावेळी बोलताना प्रदिप देशमुख म्हणाले, भाजपाने गेली पाच वर्षांत अतिशय नियोजशून्य पद्धतीने कारभार करुन पुण्यासारख्या सुंदर शहराचे वाटोळे केले. शहरांतील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साठून शहराला एखाद्या तळ्याचे रुप आले आहे तसेच अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी सुद्धा शिरले आहे. ही अतिशय दयनीय अवस्था असून भाजपाने पुणे शहर अक्षरशः बुडविले आहे. एवढेच नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पुण्यातील भाजपा नेत्यांनी हे शहर बकाल करुन खुद्द पंतप्रधानांना खोटे पाडले आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या शब्दाचाही मान त्यांना ठेवता आला नाही. याच शहरात स्मार्ट सिटी योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले होते की, शहरांमध्ये गरीबीला पचविण्याची ताकद आहे. त्यामुळे शहरांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे. पण पुण्यातील भाजपा नेत्यांनी पायाभूत सुविधांसाठी आलेला पैसा गिळंकृत करुन आपली गरीबी पचवली आहे. शहराच्या विकासाला तिलांजली दिल्यामुळे आता पुणेकरांना बस, रिक्षा किंवा मेट्रोची नाही तर बोटीची गरज पडणार असून पुण्यामध्ये भविष्यात बोट दाखवा, बोट थांबवा ही योजना केंद्र व राज्य सरकारने हाती घ्यायला हवी असेही देशमुख यांनी म्हटले आहे.