अमरावती | राजकारणाच्या वर्तुळात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या कायम चर्चेच्या विषय ठरत आल्या आहेत. बाप्पाचे विसर्जन चुकीच्या पद्धतीने केल्याने त्यांना ट्रोल देखील करण्यात आले तसेच यापुर्वी झालेल्या राजापेठ पोलिस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यानवर फोन रेकॉर्ड केल्याच्या आरोपावरून खासदार राणा यांनी मोठा वाद निर्माण केला होता. पोलीस कुटुंबियांनी यावर तीव्र नाराजी वक्त केली होती.
याच राजापेठ पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीमध्ये नवनीत राणा यांनी मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द काढल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. याच निषेधार्थ सोमवारी भीम आर्मी तर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी राणा यांनी हे अपशब्द काढल्याचा दावा मोर्चेकऱ्यांनी केला.
भीम आर्मी एकता मिशनच्या नेतृत्त्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान खासदार राणा यांच्याविरुद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आली. खासदार राणा यांनी स्वतःला संबोधत मागासवर्गीय समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला असून यामुळे मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा शब्द वापरण्यास बंदी घातली असली तरी त्यांचा वापर केल्याने न्यायालयाच्या आदेशाची ही पायमल्ली करण्यात आली आहे. मूलभूत हक्काचे हनन केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. खासदार राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर न्यायालयीन निर्णय होणार नाही, तोपर्यंत राणा यांनी दाखल केलेले अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे रद्द करण्यात यावे, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यावर भादंवि कलम ३५३अंतर्गत गुन्हे दाखल करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन त्यांना देण्यात आले आहे.
यावेळी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीताराम गंगावणे, जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे, विदर्भ अध्यक्ष अंकुश कोचे, अखिलेश यशपाल, फिरोज पठाण, रानी नाजी इरानी, अनवर शेख, इमरानउद्दीन इमानदार आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.