पुणे | केंद्रीय मंत्री रेणुका सिंग तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांचं माझ्या लोकसभा मतदारसंघात मी स्वागत करतो, असं शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. पण हा दौरा केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने करू नये. तर रेणुका सिंग ज्या खात्याच्या केंद्रीय मंत्री आहेत, त्या आदिवासी समाजासह मतदारसंघातील शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे प्रलंबित प्रश्न त्यांनी जाणून घ्यावे. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर आवाज उठवावा, असं आवाहन खासदार कोल्हे यांनी केलं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा न करता आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर लक्ष द्या. त्यासोबतच बाळ हिरडा वनउपज खरेदी करण्यासाठीचा प्रश्न अनेक वर्ष रखडला आहे. त्याच्या खरेदी-विक्रीसाठी एक सक्षम यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने विचार करावा आणि त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. जुन्नरच्या दौऱ्यादरम्यान कांद्याच्या प्रश्नाकडे देखील लक्ष द्यावं आणि कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी. तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा कॅबिनेटमध्ये मांडाव्या, अशा अनेक मागण्या खासदार कोल्हेंनी रेणुका सिंग यांच्याकडे केल्या आहेत.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, हा दौरा केवळ निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा शिरूरमध्ये प्रलंबीत मागण्या पूर्ण कराव्यात. तसेच अवघ्या हिंदुस्थानाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर 100 फुटी भगवा ध्वज लावावा, ही मागणी मी संसदेत केली आहे. शिवाजी महाराजांचा भगवा शिवनेरीवर का लागला नाही? हा प्रश्न कॅबिनेटमध्ये उपस्थित करावा. तसेच माझ्या मतदारसंघातील आदिवासी, शेतकरी बांधवाचे प्रश्न आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी भगवा फडकवण्याच्या दृष्टीने आपण दौऱ्याकडे पाहावे.