मुंबई | पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आगपाखड केली. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे निश्चित झाले होते. वेदांत कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन तशी माहितीही दिली होती. पण सरकार बदलल्यानंतर एका महिन्यात अशा काय गोष्टी घडल्या की, ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेला का, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, राज्यातील सध्याच्या व्यवस्थेवर कोणाचा विश्वास उरलेला नाही. रोज बदल्या होत आहेत. कोण कुठे जातंय ते कळत नाही, त्यामुळे काहीच कळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री सगळीकडे गरागरा फिरत आहेत. पण आता त्यांनी मंत्रालयात बसून काम करण्याची गरज आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प राज्याबाहेर गेला असला तरी आता एअरबसचा एक प्रकल्प आणि क्युबिक कंपनीचा प्रकल्प हे महाराष्ट्रात येण्याच्या मार्गावर आहेत. आता किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्राबाहेर जाऊ नयेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.