मुंबई | ठाकरे सरकारने फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पासाठीचे आर्थिक पॅकेज जाहीर करायला उशीर लावल्यानेच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला, या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आरोपाला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही निर्णय घेताना आवश्यक ती प्रक्रिया पार पाडावी लागते. पण काही सरकारं अशी असतात की, ते एखादा निर्णय किंवा गोष्ट नुसतीच जाहीर करून सोडून देतात. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शिंदे-फडणवीस सरकारच्या दिशेने होता. त्यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देऊ म्हटलं आणि तो विषय सोडून दिला. गोविंदांना विमा संरक्षण देऊ, अशी घोषणा केली आणि तो विषय सोडून दिला. परवाच पंतप्रधान किसान योजनेसारखी योजना महाराष्ट्रात आणणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. यावरुन नंतर खडाजंगीही झाली. अशा अनेक गोष्टी त्यांनी सोडून दिल्या आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा फॉक्सकॉन-वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कसा गेला यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले. मी काल यासंदर्भात पत्रकारपरिषद घेतली. त्यानंतर यासंदर्भात राज्य सरकारकडून काही ठोस उत्तर येईल, असे मला वाटले होते. पण त्यानंतर व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटीतून पुढे आलेल्या माहितीतून काही संदेश सोशल मीडियावर फिरायला सुरुवात झाली. 2016 साली महाराष्ट्र सरकार आणि फॉक्सकॉन कंपनीत झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतीची छायाचित्रे सोशल मीडियावर फिरत आहेत. परंतु, तो प्रकल्प आणि आताचा प्रकल्प हे वेगवेगळे आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.