पुणे | घरकामाच्या बहाण्याने ज्येष्ठाची घरी नोकरीस राहून त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या बंटी-बबलीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल पावणे तेरा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
रेखा राहुल क्षिरसागर (वय ३०, रा. वानवडीगाव) व ऋषभ विनोद जाधव (रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
तक्रारदार यांच्या घरातून एक-एक सोने चोरीस गेले होते. त्याबाबत सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांनी सूचनाकरून आरोपींचा माग काढण्याबाबत सांगितले होते. त्यानूसार, वरिष्ट पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व त्यांचे पथक माहिती घेत होते. यादरम्यान गुन्हयातील संशयीत महिला व तिचा साथीदार नटराज हॉटेल जवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पोलीस निरीक्षक कांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रेखा ही तक्रारदार यांच्या घरी घरकामासाठी म्हणून राहिली. तिने काम करत असताना एक-एक सोन्याचे दागिने चोरी केले. ते सोने ती ऋषभ याच्या मदतीने सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे घेतल्याचे समोर आले आहे.
फ्लॅट फोडून चोरट्यांचा लाखोंवर डल्ला
औंध तसेच कोथरूड भागातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी दोन घटनांमध्ये आठ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी चतु:श्ंगी पोलीस ठाण्यात ५९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला आहे. तक्रारदार हे न्यू डी. पी. रोडवरील महेश पॅराडाईज या इमारतीत राहतात. कामानिमित्त कुटूंबासह घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॉक तोडून बेडरूममध्ये असणाऱ्या कपाटातून सोन्याचे तसेड डायमंडचे दागिने व इतर असा ७ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलीस करत आहेत. तर, कोथरूड भागात देखील घरफोडी झाली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. हा प्रकार १३ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला. तक्रारदार हे मंत्री पार्क इमारतीत राहतात. कामानिमित्त घराला कुलूप लावून गेले होते. चोरट्यांनी घरफोडीकरून घरातील २१ हजार ५०० रुपयांचे ५ ग्रॅम सोने व रोकड असा ऐवज चोरून नेला.