मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मुंबईतील वडाळा भागातून या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल वीरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी 5 सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाली होती. वडाळा येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेजवळ पीडित मुलगी पोहचली असताना आरोपीने तिचे अपहरण केले. आरोपी विशाल वीरकरने पीडितेला बोलेरो कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि तिला पुणे एक्स्प्रेस वे च्या दिशेने नेले. एक्स्प्रेस वे लगतच्या एका अज्ञात ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण माटुंगा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विशाल वीरकरविरोधात भारतीय दंड संहितेनुसार, कलम 363, 376, 323 आणि 506, पोस्को कायद्यातील कलम 4,8 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.