पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा अनुभव सांगितला. त्यांच्या या भेटीमुळे आणि संवादामुळे सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यावेळी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या भेटी होत आहेत. त्यांचे कर्तृत्व व अनुभव विद्यार्थ्यांना समजावा यासाठी हे उपक्रम होत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून गुरुवारी पुणे शहरचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी लोकसेवा शैक्षणिक संकुलामध्ये सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे विद्यार्थ्यांनी भव्य स्वागत केले. शाळेच्या परिसरात असलेल्या मंदिरात सर्व विद्यार्थी एकत्र जमले होते. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक पायगुडे, प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. अश्व संचलनासोबत त्यांना सैनिकी मानवंदना देण्यात आली. लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राचार्य नरहरी पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी तन्मय कांबळे, नील दोंदे, वंगजुर कर्मा यांचा सन्मान सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला.
कर्णिक यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना भ्रष्टाचार, आदर्श पोलिसांची भूमिका, अधिकारी होण्यासाठीचा प्रवास आदी विषयांवर प्रश्न विचारले. रोहन ठोंबरे, श्लोक भगोरे, यज्ञेश सोनटक्के या विद्यार्थ्यांनी कर्णिक यांना त्यांचे चित्र काढून भेट दिले. कलाशिक्षक शंकर साळुंखे यांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य डेनसिंग, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य पी. शॉफीमॉन, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख रेश्मा मांढरे यांनी केले.