मुंबई | पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळीच्या कथित घोटाळ्याचा पैसा राऊतांनी कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या नावाने विविध बनावट कंपन्यामध्ये गुंतवला असं ईडीच्या तपासात पुढे आले आहे. 1 ऑगस्टला संजय राऊतांना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बुधवारी राऊतांच्या जामिन याचिकेवर सुनावणी होणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाले. त्यात राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पैसे जमा झाले असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला चौकशीत सांगितले की, संजय राऊतांनी राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून ‘ठाकरे’ सिनेमा काढला होता. राऊतांनी या सिनेमात बेहिशोबी पैसे वापरले. एप्रिल 2021 मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत असा दावा केला.
वरील प्रकल्पांमध्ये बेहिशेबी पैसे गुंतवण्याबरोबरच राऊतांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या नावाने उघडलेल्या विविध शेल कंपन्यांद्वारे त्यांचे बेहिशेबी पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली असं स्वप्ना पाटकर यांनी म्हटलं. तर मी कुठल्याही कंपनीशी निगडित नाही. माझी मुलगी आणि पत्नी एन्टरटेनमेंट कंपनी चालवतात असा दावा राऊतांनी केला. तर मराठी सिनेमाच्या माध्यमातून नफा दाखवत राऊतांनी 50 लाख रुपये घेतले. जानेवारी 2015 मध्ये मराठी सिनेमा बाळकडू रिलीज करण्यात आला होता. हा सिनेमा कुठल्याही लाभाशिवाय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली म्हणून काढण्यात आला. मात्र या सिनेमानं 60 लाख रुपये निव्वळ नफा कमवला. त्यापैकी राऊतांनी 50 लाख रुपये माझ्या बँक खात्यातून मला चेक देण्यास भाग पाडले. त्यांच्या नावाने धनादेश काढला. या सिनेमासाठी संजय राऊतांचं कुठलेही योगदान नव्हतं. त्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतले असं स्वप्ना पाटकर यांनी ईडीला सांगितले.