मुंबई | मंत्रालयामध्ये एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आले होते. यावेळी पवारांना ताटकळत थांबावे लागले. अगदी अडीच तास वाट पाहून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले नाही. त्यानंतर अजित पवार कार्यक्रमातून निघून गेले.
फिफा स्पर्धेसाठीचा लोगो अनावरणाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी पवार यांनी उपस्थिती लावली होती. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मंत्रिमंडळ बैठक लांबल्याने दोघेही कार्यक्रमाला वेळेत पोहचू शकले नाही. ज्यामुळे अजित पवारांना जवळपास अडीच तास वाट पहावी लागली. दरम्यान, तीन तास होऊनही कार्यक्रम सुरु न झाल्याने पवार मंत्रालयातून निघून गेले. पवार निघून गेल्यानंतर संबधित कार्यक्रम सुरु झाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार होते. कार्यक्रम दुपारी 12 वाजता सुरु होणार, अशी माहिती मिळाल्याने पवार वेळेत मंत्रालयात पोहोचले. दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठक सुरु असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमास्थळी येऊ शकले नाही.अजित पवार यांनी माहिती संपर्क सचिवांकडे वाट पाहिली. जवळपास तीन तास उलटल्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न आल्याने अखेर पवारांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रमाशी संबधित काही अधिकाऱ्यांना भेटून नाराजी व्यक्त केली.
या घडलेल्या घटनेवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते यावेळी म्हणाले, एखाद्या कार्यक्रमाला उशीर होत असतो. जनतेच्या हितासाठी बैठकीत निर्णय घेत असताना उशीर होतो. कार्यक्रम हे वेळेतच झाले पाहिजेत. मात्र, मविआच्या काळात चर्चा होत नसल्याने ते वेळेत पोहोचत होते, असा टोला पवारांना लगावला. अजित पवार नाराज होतात म्हणजे ‘अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यू आता है’ असा टोला मुनगंटीवारांनी लगावला.