मुंबई | शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा काल मुंबईत पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान केलं असून यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सभेवर टीका करत उद्धव ठाकरे यांनी नैराश्यातून वक्तव्य केल्याचं सांगितलं आहे.
“काल उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखांसोबत मेळावा पार पडला पण त्यांच्या सभेत काहीच दम नव्हता” अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली. त्याचबरोबर आज एनआयए आणि एटीएसने राज्यातील जवळपास 20 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तर या कारवाईवर सध्या बोलणं उचित ठरणार नाही कारण ही कारवाई आणि चौकशी अजून सुरू आहे असंही ते म्हणाले.
“कालच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांचं नैराश्य दिसलं. त्यांनी त्यांच्या भाषणात आमच्यावर टीका केली पण ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यावेळी तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो तकदीर मे लिखा होता है… मागच्या अडीच वर्षे महाविकास आघाडीने मला संपवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मला संपवू शकत नाहीत” असं फडणवीस म्हणाले आहेत.