यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना या फटका बसला आहे. फेड रिझर्व्हने यातून बाहेर पडण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कठोर भूमिका कायम ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शुक्रवारी सकाळी, रुपया 25 पैशांनी घसरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.09 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला. रुपयाची ही नीचांकी पातळी आहे. यापूर्वी गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 80.86 वर बंद झाला होता.
युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत आहेत. परदेशी बाजारात अमेरिकी चलनाची मजबूती, देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ याचाही रुपयावर परिणाम होत आहे. बँक ऑफ जपान आणि बँक ऑफ इंग्लंड यांच्या चलनविषयक धोरणावर सर्व लक्ष केंद्रित केले जाईल, असे फॉरेक्स ट्रेडर्सचे म्हणणे आहे.
डॉलर 20 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे परकीय चलन आणि बुलियन विश्लेषक गौरांग सोमय्या म्हणाले, “फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया नवीन पातळीवर घसरला. डॉलरने 20 वर्षांच्या उच्चांक गाठला आहे, कारण फेडने त्याच्या आगामी पुनरावलोकनात मोठ्या वाढीचे संकेत दिले आहेत.
रुपया नीचांकी पातळीवर गेल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. भारतीय चलनाच्या घसरणीचा सर्वात मोठा परिणाम आयातीवर होणार आहे. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील. देशात 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते, म्हणजेच भारताला कच्च्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल आणि परकीय चलन जास्त खर्च होईल. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.