अलिबाग | तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा आम्ही बाळासाहेबांचा काढतो, असं आव्हान बंदरे आणि खणिकर्म मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे एका व्यक्तीचे बाप नसून सगळ्या शिवसैनिकांचे बाप आहेत, असं विधानही दादा भुसे यांनी केलं आहे. भुसेंच्या या आव्हानामुळे आता शिंदे गट आणि शिवसेनेत नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक गुरुवारी अलिबाग इथं झाली. त्यावेळी राज्याचे बंदरे आणि खणिकर्म मंत्री दादा भुसे बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना दादा भुसे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे एका व्यक्तीचे बाप नाहीत. ते समस्त शिवसैनिकांचे बाप आहेत. बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष असल्याचं जाहीर केलं आहे. शिवसैनिकांच्या बापाला कमी लेखू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढतो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जा.”
मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना भेटले नाहीत आणि आता प्रत्येकाला भेटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच महिन्यांपासून काम करतायत. तसं काम अद्याप एकाही मुख्यमंत्र्याने केलेलं नाही, असा टोलाही दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शिवसेनेतल्या बंडापासून सातत्याने उद्धव ठाकरे बंडखोरांवर टीका करत आहे. बाळासाहेबांचं नाव वापरू नका, माझा बाप पळवू नका, अशा आशयाची टीका उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत. त्यालाच आता दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.