पुणे | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याचा ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेनंतर मनसेने पुण्यात एल्गार पुकारला आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेला आता मनसेकडून ‘हर हर महादेव’ अशा घोषणेने उत्तर देण्यात येत आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन चालू आहे.
‘दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे’ या घोषणा देत मनसे कडून आंदोलन करण्यात येत असून पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला आहे. यावेळी अलका टॉकीज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावचं वातावरण निर्माण न होण्यासाठी पोलिसांकडून दखल घेतली जात आहे.
दरम्यान, गुरूवारी राष्ट्रीय तपास संस्थेने PFI च्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकून 100 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील व्हिडिओही व्हायरल झाला आहे पण पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
तर PFI च्या अटक केलेल्या आरोपींकडून अनेक मोठमोठे खुलासे होऊ लागले आहेत. PFI कडून मुस्लीम तरूणांची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचं PFIचं लक्ष्य असल्याचं ATSच्या तपासातून समोर आलं आहे.