चुकीची माहिती पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) 10 चॅनेलवरील सुमारे 45 व्हिडीओ ब्लॉक केले आहेत. संबंधित व्हिडीओ ब्लॉक करण्याचे आदेश 23 सप्टेंबर रोजी माहिती तंत्रज्ञान (इंटरमीडिएट गाइडलाइन्स आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 च्या तरतुदींनुसार जारी करण्यात आले होते. ब्लॉक केलेला व्हिडीओ 1 कोटी 30 लाखांहून अधिकवेळा पहिले गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चुकीची माहिती असलेल्या बातम्या आणि धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने पसरवलेले मॉर्फ केलेले व्हिडीओ समाविष्ट आहेत. उदाहरणांमध्ये खोटे दावे जसे की, सरकारने काही समुदायांचे धार्मिक अधिकार काढून घेतले आहेत. यातच धार्मिक समुदायांविरुद्ध हिंसक धमक्या, भारतात गृहयुद्धाची घोषणा केली आहे. अशा व्हिडीओंमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे.