देशातील अनेक राज्यांमध्ये आज दुसऱ्यांदा पीएफआयच्या (PFI) ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत 247 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात 44, कर्नाटकात 72, आसाममध्ये 20, दिल्लीत 32, महाराष्ट्रात 43, गुजरातमध्ये 15, मध्य प्रदेशात 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयवर ही कारवाई सुरु आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दिल्लीतही पीएफआयवर पोलिस कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण दिल्लीतून 32 जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील अनेक भागात आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. धरणे-प्रदर्शनाच्या नावाखाली मोठे षडयंत्र रचण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व दिल्लीत विशेष सूचना जारी करण्यात आली आहे. पुढील 60 दिवसांसाठी, विशेषत: जामिया विद्यापीठाभोवती मशाल आणि मेणबत्ती मार्चसारख्या निदर्शनांवर बंदी घालण्यात आली आहे. कलम 144 लागू करण्यात आले असून आदेश न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या आदेशानंतर जामिया विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना कडक इशारा दिला आहे. जामियानगरमध्ये निमलष्करी दले गस्त घालत आहेत.
कर्नाटकातही पोलिसांची कारवाई झाली आहे. बिदर, कोलार, बागलकोट, विजयपुरा आणि मंगलोरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. येथे पीएफआयशी संबंधित 72 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.