पुणे | रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज च्या वतीने जयराज ग्रुपचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते राजेश शहा यांना “समाज परिवर्तन पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा, प्रसिद्ध उद्योजक व पूना हॉस्पिटल चे विश्वस्त नैनेश नंदू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे च्या अध्यक्षा नमिता नाईक, रोटरी क्लब च्या सेवा प्रकल्पचे संचालक विवेक कुलकर्णी, सचिव अतुल दुर्वे, नितीन नाईक, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य, व्यापारी नितीन नहार तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हा पुरस्कार म्हणजे राजेश शहा गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष, त्याचबरोबर श्री पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ या संस्थेचे महासचिव, श्री महावीर जैन विद्यालय, पूना हॉस्पिटल, पूना गुजराती केळवाणी मंडळ, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इत्यादी सामाजिक व शैक्षणिक संस्थाचे विश्वस्त म्हणून अनेक संस्थांच्या माध्यमातून स्वतःच्या वैयक्तिक आणि व्यासायिक पातळीवरून करीत असलेल्या सामाजिक कार्याची पावतीच आहे.
या कार्यक्रमात आदर्श गणेश मंडळ स्पर्धेतील विजेत्या पंचरत्नेश्वर गणेश मंडळ, गणेश गार्डन गणपती मंडळ, ट्रेझर पार्क सोसायटी गणेश मंडळ आदी गणेश मंडळांना ही पारितोषिके देऊन रोटरी क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले.