मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मराठीतील दोन आघाडीच्या कलाकारांचं भांडण जुंपलं होतं. अमेय वाघ आणि सुमित राघवन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. दोघांच्या या फेसबुक वॉरची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. आपापल्या कामात दंग असलेल्या अमेय आणि सुमितचं नक्की कशावरून भांडण झालं या चिंतेने चाहत्यांना बुचकळ्यात पाडलं होतं. पण आता अमेय आणि सुमित यांच्या त्या भांडणाचा उलगडा झाला आहे. दोघंही लवकरच आमनेसामने येणार आहेत. नक्की हे सगळं कशावरून सुरू झालं आणि याचा शेवट काय आहे हे प्रेक्षकांना कळणार आहे.
दोन दिवसांपूर्वी अमेय आणि सुमित यांच्यात शाब्दिक भांडण लागलं आणि नेटकऱ्यांना हे काय चाललय असा प्रश्न पडला. अमेयने एक पोस्ट करत असं लिहिलं होतं की, जंगलात राघू खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. यावर अमेयला उत्तर देताना सुमितने म्हटलं होतं की फक्त नावात वाघ असून चालत नाही. काही जण आरोळीला डरकाळी समजतात पण ती मदतीसाठीची याचना असते. अमेयनेही यावर बघू कोण किती पाण्यात आहे असं प्रत्युत्तर दिलं होतं. अमेय आणि सुमित यांच्यातील हा सोशलमीडियावर रंगलेला पोस्टवाद इतका व्हायरल झाला की नेमकं काय सुरू आहे हे कळेना. पण नुकताच या दोघांनी त्या भांडणाचा तिढा सोडवला आहे.
अमेय आणि सुमित ही जोडी लवकरच आमनेसामने येणार आहे. नाही, नाही, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भांडण वाढवण्यासाठी नव्हे तर ते भांडण नव्हतच हे सांगण्यासाठी. झी मराठी पुरस्कार 2022 हा सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सोहळ्याच्या रेडकार्पेटवर अमेय आणि सुमित ही जोडी धमाल करताना दिसणार आहे. इकडे फेसबुकवर तर एकमेकांशी भांडताहेत आणि तिकडे धमाल सुरू आहे. झी मराठी अवार्ड सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अमेय आणि सुमितच्या खांद्यावर आहे. आता या सोहळ्यात जरा मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी लुटूपुटूची भांडणं हवीच की. त्याचीच झलक या दोघांनी फेसबुक पोस्ट वादातून दाखवली.