मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI बँक ही आपल्या भारतातील उच्च व मध्यवर्ती बॅंक आहे. RBI नेहमी ग्राहकांच्या सुरक्षितेसाठी व कल्याणासाठी वेळोवेळी योग्य पावले उचलत असते. अलीकडेच, रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना खराब आर्थिक परिस्थितीमुळे रद्द करण्यात आला आहे. 22 सप्टेंबरपासून बँकेच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा एकदा मध्यवर्ती बँकेने कठोर पावले उचलत जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला नियमांचे पालन न केल्याने 50 लाखांचा दंड ठोठावला आहे.
RBI कडून 31 मार्च 2020 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे महाराष्ट्रातील या बँकेची तपासणी करण्यात आली होती. सहकारी बँकेने विहित नियमांनुसार काही खाती नॉन परफॉर्मिंग ॲसेट (NPA) म्हणून वर्गीकृत केली नाहीत. यासोबतच ग्राहकांना कोणतीही माहिती न देता बचत बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मध्यवर्ती बँकेने इतर नऊ सहकारी बँकांनाही दंड ठोठावला आहे. आरबीआयने म्हटले आहे की ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतू नाही.