गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधात साजरा होणार नवरात्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होत आहे. यंदा राज्यातील जनतेला नवरात्रोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, नवरात्रीचा रात्री 12 पर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी केली जात होती. जी आता सरकारने मान्य केली आहे.
तत्पूर्वी सरकारने शेवटचे फक्त दोन दिवस 12 पर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली होती. मात्र आता सरकारने यात आणखी एक दिवसाची वाढ केली आहे. आधी ही वेळ 10 पर्यंत होती. मात्र आता 12 वाजेपर्यंत सूट दिल्याने सोमवार, मंगळवार आणि शनिवार या तीन दिवशी अनेकांना गरबा खेळण्याचा आनंद घेता येणार आहे.
सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार, पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 अन्वये वर्षामध्ये एकूण 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून 13 दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच 2 दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.
यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी 1 ऑक्टोबर, 2022 रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, 3 ऑक्टोबर आणि मंगळवार, 4 ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.