मुंबई | धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. आता धनुष्य बाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. हा शिंदे गटाला दिलासा नाही, तर युक्तिवादाचं कोर्ट बदललेलं आहे. जे सुप्रीम कोर्टात होतं, ते आता निवडणूक आयोगाकडे गेलंय, तिथे युक्तिवाद सुरु राहील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मी काही ठिकाणी बघत होतो, कोणत्या गटाला दिलासा मिळाला, पण हा गद्दारांना दिलासा नाही, तर युक्तिवादाचं फक्त कोर्ट बदललेलं आहे. जे सुप्रीम कोर्टात सुरु होतं, ते आता निवडणूक आयोगात होईल, तिथे युक्तिवाद सुरु राहील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
जे काय होत आहे ते जनतेच्या समोर आहे महाराष्ट्रातील जनता, जगातील जनता बघत आहे. हा युक्तिवाद फक्त शिवसेनाच नाही, तर लोकशाही आणि संविधानासाठी महत्त्वाचा राहील. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, सत्य आमच्या बाजूने राहील, विजयादशमीला जसा सत्याचा विजय झाला तसा आमचा देखील विजय होईल, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
कोणाचा विजय होतो, जेव्हा असं वाटतं की शिवसेनेला धक्का बसलाय, तेव्हा गद्दारांच्या गटात आनंद-जल्लोष केला जातो. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले, तेव्हा देखील आपण बघितलं होतं टेबलावर चढून डान्स करत होते. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळं काही अपेक्षित नाही, असं आदित्य म्हणाले.