काबुल | अफगाणिस्तानची राजधानी पुन्हा एका आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरली. शिक्षण संस्थेत घुसून आत्मघाती हल्लेखोरानं स्वतःला स्फोटानं उडवून दिलं. या भीषण स्फोटात २० जण ठार झाल्याची माहिती आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे प्रवक्ता नफी टकोर यांनी माहिती देताना सांगितलं की, आज, शुक्रवारी सकाळी हा स्फोट झाला. काबुलच्या दक्षिणेकडील दस्ती बारची परिसरात एका शिक्षण संस्थेत हा स्फोट झाला. अफगाणिस्तान पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सुसाइड बॉम्बरनं शैक्षणिक संस्थेत घुसून स्वतःला बॉम्बस्फोटानं उडवून दिलं.
बॉम्बस्फोट घडवून आणला त्यावेळी अनेक विद्यार्थी सेंटरमध्ये परीक्षेची तयारी करत होते. या हल्ल्यात २० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तर २७ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही. स्थानिक मीडियाकडून या हल्ल्यानंतरची दृश्ये आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. यात हल्ल्यात जखमी झालेले लोक दिसत आहेत.
या हल्ल्यानंतर सुरक्षा दले घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले. नफी टकोर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये २३ सप्टेंबरला एका मशिदीजवळ कारमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात किमान सात जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक लहान मुलांसह ४१ जण जखमी झाले होते. त्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नव्हती.