पुणे | पुण्याची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेली श्री तांबडी जोगेश्वरी देवी ही पुण्याची रक्षण करणारी आदिशक्ती मानली जाते.ऐतिहासिकदृष्ट्या देखील तांबडी जोगेश्वरी मंदिराला महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून तांबडी जोगेश्वरीला ग्रामदेवता म्हणून अग्रपूजेचा मान देण्याची पुर्वापार प्रथा चालत आली आहे.
पुण्यातील बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरीचे दगडी मंदिर आहे. शहरातील अनेक पुरातन मंदिरांपैकी एक मंदीर मानले जाते. त्र्यंबक बेंद्रे यांनी इ.स.1545 मध्ये हे मंदीर बांधले. मंदिरामध्ये गाभारा व सभामंडप आहे. गाभाऱ्यात देवी असून जोडूनच समोर सभामंडप आहे. त्याला लागूनच असलेल्या सभागृहात भजनाचे कार्यक्रम होतात. सभामंडप दगडी असून त्याच्या माथ्यावर कलश आहे. मंडपात प्रवेश करताना सुरुवातीलाच देवीकडे तोंड करून देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. मंडपात विठ्ठल रुक्मिणीची आणि नागासह गणेशाची छोटी मूर्ती आहे.गाभाऱ्यामध्ये देवीची सुंदर व प्रसन्नमय मुर्ती असून ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. जोगेश्वरीची मूर्ती साधारणतः अडीच फूट उंचीची असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात त्रिशूळ आहे. खालच्या उजव्या हाताने तिने असुराचे शीर पकडले असून, खालच्या डाव्या हातात कमंडलू आहे.
देवीला तांबडी जोगेश्वरी का म्हंटले जाते ह्या मागे देखील एक आख्यायिका आहे. माहिष्मती नगरीतील महिषासूराचा पराभव करणारी ती महिषासूरमदिर्नी या महिषासूराचे अंधक, उद्धत, बाष्कल, ताम्र असे बारा सेनापती होते यातील ताम्रासूराचा वध करणारी ती ताम्र योगेश्वरी पण कालांतराने तिची तांबडी जोगेश्वरी या नावाने पूजा केली जाऊ लागली.
तांबडी जोगेश्वरी देवीचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आढळतो. ‘तां नमामि जगद्धात्री योगिनी परयोगिनी’ अशा शब्दात भविष्यपुराणामध्ये ग्रामदेवतेचं वर्णन करण्यात आलं आहे.’जीवेश्वरैकस्य ईश्वरी सा योगेश्वरी ‘जीव आणि ईश्वर यांची एकरूपता दर्शवणारी आदिशक्ती म्हणजे योगेश्वरी. योगिनी हे योगेश्वरीचं दुसरं नाव असून कालांतराने योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन या देवीला जोगेश्वरी असं संबोधण्यात येऊ लागलं.
पुण्याच्या ग्रामदेवीचा नवरात्र उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. मोठ्या भक्तीभावाने महापूजा घातली जाते. नवरात्रामध्ये देवीला विशेष अशी सजावटी केली जाते. दसऱ्यापर्यंत रोज देवीची विविध वाहनं साकारली जातात. शेषासनी नारायणी, गरूडारूढा वैष्णवी, अश्वारूढ महेश्वरी, वृषभारूढ आदिमाया अशी देवीची वाहनं साकारली जातात. पेशवे काळापासून आत्तापर्यंत बेंद्रे घराण्याकडे देवीच्या पूजेचा मान आहे. दसऱ्याच्या दिवशी देवीची वाजतगाजत पालखी निघते. पुण्याची ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी माता सर्वांची जगतजननी आहे.