मुंबई | उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू सहकारी आणि सल्लागार म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांमध्ये जोर धरला आहे. शिंदे गटातील अनेक नेत्यांकडून मिलिंद नार्वेकर लवकरच आमच्यासोबत सामील होतील, असा छातीठोक दावा सातत्याने केला जात आहे. या सगळ्यामुळे शिवसेनेच्या गोटातील चिंता वाढली असतानाच मिलिंद नार्वेकर हे रविवारी रात्री अचानक शिवाजी पार्कवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट केले.
या ट्विटमधून मिलिंद नार्वेकर यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर सुरु असलेल्या दसरा मेळाव्याच्या तयारीची छायाचित्रे शेअर केली आहेत. तसेच नार्वेकर यांनी इथून काही अंतरावरच असलेल्या बंगाल क्लबच्या देवीचे दर्शनही घेतले. यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी दसरा मेळाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाची पाहणी केली. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी आपण शिंदे गटात जाणार नाही, शिवसेनेतच राहणार, असा संदेश दिल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. बाळासाहेबांचे सहकारी चंपासिंग थापा यांनी आम्हाला साथ द्यायचा निर्णय घेतलाय, आता ‘त्यांचे’ (उद्धव ठाकरे) सहकारीही आपल्याकडे येणार आहेत, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. तेव्हापासून मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने या संभ्रमात आणखीनच भर पडली होती. परंतु, मिलिंद नार्वेकर यांनी थेट शिवतीर्थावर जाऊन तुर्तास या सर्व चर्चांना विराम दिला आहे.