पुणे | शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये सुरस निर्माण झाली आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून हा वाद आणखी चिघळताना दिसत आहे. या वादामध्ये राष्ट्रवादी उडी घेत असल्याची चर्चा असतानाच राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवारांनी आता शिंदे आणि ठाकरे दोघांनाही सुनावलं आहे. याशिवाय नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांविषयीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दसरा मेळाव्यावरुन ठाकरे, शिंदे दोघांनाही सुनावताना शरद पवार म्हणाले की, “एका पक्षाचे दोन भाग झाले आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चालवलं गेलं. या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्यातले जबाबदार लोक आहे. त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकायला हवीत. आणि ही पावलं टाकण्याची जबाबदारी आम्हा लोकांसारख्या सिनियर लोकांवर असेल, त्यापेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे. यातून अपेक्षा अशी करूया की, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल”.
नुकत्याच पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतल्या जागेसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा ठाकरे गटालाच असेल, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.