रात्री साडेअकरा ते दीड वाहतूक पूर्णपणे बंद; वाहतूक वाकडमार्गे वळवण्यात येणार
पुणे | पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर येथील रस्त्याच्याकडेचे खडक फोडण्यासाठी मंगळवारी रात्री साडेअकरा ते दीड असा दोन तासांचा ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे पुणे – बेंगलोर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मुंबई ते सातारा या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान, ही वाहतूक वाकडमार्गे वळवण्यात येणार आहे.
खडक फोडण्यासाठी १६ ठिकाणी होल्स पाडत स्फोट करण्यात येणार आहेत. हे स्फोट होताना दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात येणार आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच एका बाजूची लेन वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहे.
काल एका बाजूची टेकडी फोडण्यासाठी भर उन्हामध्ये दुपारी हा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु ह्याची पूर्वकल्पना न देता हा ब्लॉक घेण्यात आला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ह्याचा नागरिकांना प्रचंड त्रास झाला होता. ह्यामध्ये दुचाकीस्वार, अवजड वाहने, विविध शाळांच्या बस अडकल्या होत्या. त्यामुळे दिड ते दोन तास एकाच जागी वाहन असल्याने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रासून गेले होते.
मुले वेळेत घरी न आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण यामुळे निर्माण झाले.
पालकांनी अनेकांकडून फोनवरुन माहिती घेतली, त्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे आज हा ब्लॉक दिवसा न घेता रात्री घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पूल पाडण्यासाठी १३०० होल्स अन् टेकडीसाठी १६ होल्स पाडण्यात आले होते. तसेच ६०० स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. मात्र या टेकड्या पाडण्यासाठी १६ होल्स पाडून त्यात स्फोटकं भरण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर काऊंटडाऊन देत या टेकडी पाडण्यात येणार आहे. रस्ता मोकळा करण्यासाठी या टेकड्या पाडल्या जात आहे. स्फोट झाल्यानंतर राडारोडा उचलण्याच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सुरळीत वाहतूक सुरु होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.