मुंबई | आज मुंबई मध्ये दोन वेगवेगळे मेळावे होत आहे. एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर. पक्षाची ही अवस्था पाहून मला वाईट वाटत असून उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असती तर ही वेळ आली नसती असं वक्तव्य रामदास कदम यांनी केले. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी माझ्या आवाजाची तोफ बंद केली असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना आणि कदम यांच्यातील संघर्षही तीव्र झाला आहे.
एक पक्ष, एक मैदान, एक झेंडा अशी भूमिका “बाळासाहेब ठाकरेंची होती. ५६ वर्षापूर्वी ही प्रथा सुरू करण्यात आली.
परंतु आज शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळत आहेत. हे सर्व एकाच पक्षाचे असून या पक्षावर ही वेळ का आली? हा प्रश्न मला आहे. आम्ही ५२ वर्षे पक्षासाठी काम केलं. पक्षाची अशी दयनीय अवस्था पाहून मला दुखः होत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी दोन पावले माघार घेतली असती तर पक्षावर ही वेळ आली नसती” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
बाळासाहेबांच्या निधनानंतर दसरा मेळाव्यात माझ्या भाषणावर बंदी घालण्यात आली. फक्त शिवाजी पार्कच नाही तर सगळीकडील माझे भाषणे बंद करण्यात आले, याचे कारणं मलाही माहिती नाही असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
मी सर्व आमदारांना गुवाहटीतून मातोश्रीवर आणायला तयार होतो पण शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे राष्ट्रवादीला सोडायला तयार नव्हते, ते मातोश्रीवरून बाहेर निघायला तयार नव्हते आणि आता कसे बाहेर पडले? तर गद्दार कोण आहे? हे तुम्हीच ठरवलं पाहिजे असं ते म्हणाले.