मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये झालेल्या वादानंतर राज्यात नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवण्यात आले आहे. शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेना (Congress Supports Shivsena) पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी (दि.10) दिली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आता शिवसेनेला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले, ‘अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणार आहे. सोनिया गांधी यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. ही जागा काँग्रेसची आहे. पण सहकार्य करू’, असा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच मित्र अडचणीत आला तर त्याला मदत करणे हाच आमचा धर्म आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेना उमेदवाराचा प्रचार करेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 6 नोव्हेंबरला निकाल स्पष्ट होईल. त्यानंतरच या जागेवर कोणाचा विजय झाला हे समजणार आहे.