मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. पंतप्रधानांवरील टीकेनंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर अंधारे म्हणाल्या, ‘मला कोणतीही नोटीस मिळाली नाही. ती मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यात हजर होईन. कारण कायदा माझ्या बापाने लिहिला आहे’.
दसरा मेळाव्यात उद्धव गटात असलेले खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. त्यावर आता अंधारे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, ‘मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. मला जर ती मिळाली तर पोलिस ठाण्यात हजर होईन. कारण कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा? त्या नोटीशीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल.’
माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंच्या
‘मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल, तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत. जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काहीही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.