मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आईला भावनिक पत्र लिहिले आहे. ‘आई, मी नक्कीच परत येईन. जशी तू माझी आई आहेस’, तशीच शिवसेनादेखील आपली आई आहे, असे त्यामध्ये म्हटले आहे.
संजय राऊत यांना अटक झाल्यापासून ते न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत. अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाकडून फेटाळूनही लावण्यात आला. त्यानंतर आता त्यांचे न्यायालयाच्या बाहेर बाकड्यावर बसून लिहिलेले पत्र चर्चेत आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘आई, मी नक्कीच परत येईन. जशी तू माझी आई आहेस तशीच शिवसेनादेखील आपली आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्या धमक्यांना मी घाबरलो नाही म्हणून मला तुरुंगात जावं लागलं’.
दरम्यान, संजय राऊत यांनी लिहिले हे पत्र न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी सत्र न्यायालयाबाहेरील बाकड्यावर बसून लिहिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी हे भावनिक उद्गार काढले आहेत. त्यामध्ये ‘आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आला आहे. हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली आहे.’