पुणे | अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ फेब्रुवारीला होईल.धर्मादाय उपायुक्त कार्यालयाचे निरीक्षक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आसिफ शेख यांनी मंगळवारी हा निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे. ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून, फक्त कोल्हापूर, मुंबई व पुणे या तीन ठिकाणीच मतदान केंद्रे आहेत.
आसिफ शेख यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू होत आहे. तसेच मतदार यादीत नाव नसल्यास अगर चुकीचे नाव असल्यास संबंधित मतदार नागपूरचा असो, मुंबई-पुण्याचा असो वा महाराष्ट्रातील कुठल्याही गावातील असो त्यास कोल्हापूर येथे दुपारी ११ ते ३ या वेळेत जाऊनच याबाबत हरकत घेऊन दुरुस्तीची सूचना करावी लागणार असल्याचे या कार्यक्रमात नमूद केले असल्याने याबाबत पुण्यातील ‘सलाम पुणे’चे अध्यक्ष शरद लोणकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई , पुणे वा नागपूर अशा ठिकाणांहून लोकांनी आपापले नाव मतदार यादीत नसल्यास कोल्हापूरला जाऊन हरकत घ्यायची हा सभासदांना नाहक त्रास दिला जाणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत विनंती करण्यात येईल, असे ते म्हणाले. मतदार यादी तपासणे आणि त्यावर हरकती घेणे, दुरुस्ती सुचविणे आणि निर्णय घेणे या तिन्ही गोष्टी कोल्हापूरसह मुंबई, पुणे कार्यालयात देखील व्हायला हव्यात, असे ते म्हणाले. सध्या जाहीर केलेल्या कार्यक्रमात हरकती दुरुस्ती आणि त्याबाबतच्या निर्णयाच्या ठिकाणांचा पुनर्विचार करावा व त्यात बदल करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
चित्रपट महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे अध्यक्ष मेघराज भोसले व अन्य कार्यकारिणी असे तीन गट पडले आहेत. मागील महिन्यात भोसले यांनी आपल्या अधिकारात निवडणूक जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही निवडणूक जाहीर केली. एकाच संस्थेची दोनवेळा निवडणूक हा प्रकारच धर्मादायच्या कायद्यात बसत नसल्याने धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दोन्ही निवडणुका बेकायदेशीर ठरवल्या आहेत.
निवडणूक जाहीर करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आसिफ शेख काम पाहत आहेत. त्यांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास मुदत दिली होती. मात्र, ती मुदत न पाळता पुन्हा १५ दिवसांची वाढीव मुदत त्यांनी घेतली. त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कामकाजाच्या विषयासह त्या सभेच्या ठरलेल्या दिवसांपूर्वी किमान १५ दिवस आधी प्रसिद्ध झाली पाहिजे. या नियमानुसार प्रसिद्ध केली. इतर कोणतीही सूचना किंवा नोटीस सभासदांना देता येणार नाही, अशी सक्त सूचना केली आहे. महामंडळाची नवी घटना अजून मंजूर नसल्याने ही निवडणूक जुन्या मतदार यादीनुसार होणार असून, त्यात सभासद संख्या १८ हजार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम –
- सभासदांची वैध यादी करणे – १५ नोव्हेबर ते १५ डिसेंबर (कोल्हापूर कार्यालयातच )
- सभासदांची वैध कच्ची यादी प्रसिद्ध करणे – १९ डिसेंबर ते २० डिसेंबर (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )
- या मतदार यादीवर हरकतील – दुरुस्ती स्वीकारणे २१ डिसेंबर ते ४ जानेवारी रोज ११ ते ३ या वेळेत फक्त कोल्हापूर कार्यालयातच.
- हरकती व दुरुस्तीवर निर्णय घेणे – ५ जानेवारी ते ६ जानेवारी फक्त कोल्हापूर कार्यालयातच.
- अंतिम मतदार यादी प्रसिद्धी – ९ जानेवारी २०२३ (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर)
- उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारणे – १० ते १६ जानेवारी (तिन्ही कार्यालयात मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )
- छाननी – १७ जानेवारी (कोल्हापूर कार्यालयातच)
- माघार : १८ ते २० जानेवारी (कोल्हापूर कार्यालयातच)
- मतदान – ५ फेब्रुवारी (तिन्ही ठिकाणी मुंबई -पुणे आणि कोल्हापूर )
- मतमोजणी : ८ फेब्रुवारी (कोल्हापुरात)