मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर आजपासून दोन्ही पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (murji patel ) यांची उमेदवारी वादात सापडली आहे. ठाकरे गटाकडून पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला असून त्यांच्यावर आरोप देखील करण्यात आले आहेत.
ठाकरे गटाचे पर्यायी उमेदवार असलेले संदीप नाईक (Sandip naik )यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी उमेदवार म्हणून पटेल यांच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांचा अर्ज बाद करावा अशी मागणीही नाईक यांनी निवडणूक आयोगाला माध्यमांमधून केली. यावेळी नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांनाही काही सवाल केले आहेत.
आम्ही निवडणूक आयोगासमोर ५ आक्षेप घेतले आहेत. पहिला म्हणजे, मुरजी पटेल यांना शासनाच्या आदेशानुसार ६ वर्ष निवडणूक लढविता येणार नाही. न्यायालयानेही त्यांना जातीच्या कागदपत्रांमध्ये दोषी ठरवलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांना बाद करण्यात आलं आहे. तरीदेखील आयोगाने त्यांचा अर्ज स्वीकारला कसा? असा सवाल नाईक यांनी विचारला.
त्याचबरोबर, मुरजी पटेल यांना बाद केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागितली. मला ज्या तरतुदींनुसार बाद करण्यात आलं होतं, ती तरतुद रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यांना तो अर्ज मागे घ्यावा लागला होता. या याचिकेचा उल्लेख ही या अर्जामध्ये नाही, असाही दावा नाईक यांनी केला.
मुरजी पटेल यांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने अद्याप का काढून घेतला नाही? असा प्रश्न नाईक यांनी विचारला. जर त्यांचा अधिकार काढून घेतला असेल तर त्याबाबत आम्हाला माहिती द्यावी अशी मागणीही त्यांनी आयोगाकडे केली.
मुरजी पटेल यांच्यावर बोगस चेक देण्याबाबत खटला आहे. तो त्यांनी लपविला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रलंबित खटल्यांची माहिती वृत्तपत्रांमधून प्रसारित करावी लागते. ते ही पटेल यांनी केलेलं नाही. मग त्यानंतरही त्यांचा अर्ज कसा स्वीकारला? एमआयडीसीमध्ये पात्र लोकांच्या घरावर त्यांनी डल्ला मारला आहे. कित्येक लोकांना बेघर केले आहे. असा आरोपही नाईक यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल विचारत नाईक म्हणाले की, शिवसेनेच्या एका उमेदवाराला पाडण्यासाठी तुम्ही एका भ्रष्टाचारी माणसाला का पाठिंबा देत आहात? तर भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या माणसाला तुम्ही का पक्षातर्फे उभं केलं, असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. याशिवाय ऋतुजा लटके या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवार असल्याचा दावाही त्यांनी केला.