मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘राज भाऊ तुम्ही एक पत्र लिहा भाजपला. ते पत्र असं लिहा की, महामहिम राज्यपालपदाच्या खुर्चीवर बसणारे कोश्यारीजी जर वारंवार महाराष्ट्राचा अवमान करत असतील तर असे राज्यपाल कथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत’.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी लिहिले होते. त्यानंतर आज भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. यामागे राज ठाकरेंचे पत्र असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरून अंधारे यांनी राज ठाकरेंना उद्देशून व्हिडिओ काढला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, भाजपने राज ठाकरेंच्या पत्राचं कारण पुढे केलं. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे की खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम भाजपवर होत असेल किंवा भाजप त्यांचं ऐकत असल्यास माझी विनंती आहे राज ठाकरेंना. राज भाऊ तुम्ही एक पत्र लिहा भाजपला. ते पत्र असं लिहा की, महामहिम राज्यपालपदाच्या खुर्चीवर बसणारे कोश्यारीजी जर वारंवार महाराष्ट्राचा अवमान करत असतील तर असे राज्यपाल कथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत.
दरम्यान, अंधारे यांनी महाराष्ट्रातील फॉक्सकॉन-वेदांता हा महत्त्वकांक्षी प्रकल्प जो गुजरातला गेला. तो परत येण्यासंदर्भातील पत्र लिहा, अशी विनंतीही त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमधून केली आहे.