नवी दिल्ली | केंद्र सरकारने पी.एम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२ वा हप्ता जारी केला. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. मंत्रिमंडळाने गव्हाच्या एम.एस.पी.मध्ये ११० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यासह, २०२३-२४ साठी गव्हाचा एमएसपी प्रति क्विंटल २१२५ रुपये झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
गव्हाशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने मसूरच्या एम.एस.पी.मध्ये देखील कमाल ५०० रुपये प्रति क्विंटल दर मंजूर केला आहे. आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत २०२२-२३ साठी ६ रब्बी पिकांची एम.एस.पी निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये गव्हासाठी ११० रुपये, बार्ली १०० रुपये, हरभरा १०५ रुपये, मसूर ५०० रुपये, मोहरी ४०० रुपये तर, करडईच्या एम.एस.पी.मध्ये २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. असे ठाकूर यांनी सांगितले. बार्लीचा जुना एमएसपी १६३५ रुपये होता. यामध्ये १०० रुपयांची वाढ करण्यात आली असून आता तो १७३५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. हरभराचा जुना एमएसपी ५२३० रुपये होता, ज्याच्या एमएसपीमध्ये १०५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हरभऱ्याची नवीन एमएसपी ५३३५ रुपये प्रति क्विंटल असणार आहे. मसूरचा जुना एमएसपी ५५०० रुपये प्रति क्विंटल होता. ज्यामध्ये ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मसूरा ६००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे. याशिवाय मोहरीच्या एमएसपीत ४०० तर, सूर्यफुलाच्या भावात प्रतिक्विंटल २०९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे