पुणे | प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटलं जाते. प्रयत्न केल्याने अशक्य गोष्टही शक्य होते. याचाच प्रत्यय येतो कल्पना दाभाडे यांच्या अनुभवातून. चोरीच्या आरोपामुळे वडिलांचे तुरुंगात जाणे, त्यानंतर उभ्या राहिलेल्या अडचणींवर मात कल्पना दाभाडे या सीए बनल्या. त्यांचा हाच संघर्षाचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
‘फॉर द पीपल’शी कल्पना दाभाडे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना सीए होताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला या सर्व गोष्टींविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ‘मी आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. दोघांनीही खूप, कष्ट मेहनत करून मला वाढवलं. पूर्वी शाळेत जाण्यासाठी जवळपास तीन किमी चालायला लागत असे. अभ्यास करायचा कसा? हे सांगायला कोणी नव्हतं. वडिलांना चोरीच्या आरोपावरून तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे मला पुढील शिक्षणाच्या अनेक अडचणी आल्या. आईने काही कारणास्तव मला हॉस्टेलला टाकलं. त्यानंतर पदवीचे शिक्षण घेतले. त्यावेळी एका संस्थेकडून आम्हाला मदत केली जात होती. तरीही उच्च शिक्षणाची फी आणि राहणं हे परवडणारं नसल्याने शिक्षण पुढे चालू ठेवण्याबाबत अनेक अडचणी होत्या.
माझा राहायचा, खायचा प्रश्न सोडवण्यासाठी मी संस्थेकडे नोकरी मिळावी यासाठी विनंती केली होती. त्यानुसार, लातूरला भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम होते. सामाजिक संस्थेत काम करण्याचे सुरु केले. तेव्हा त्यांनी ‘मला सीए कर’ असे म्हटले होते. मात्र, सीए करणं म्हणजे सगळ्याच गोष्टींची अडचण आली असती. त्यामुळे मी नोकरीला प्राध्यान्य दिले. लातूर गेले, तेथे चार वर्षे अकाउंटंट म्हणून काम केले.
आपल्यालाच जास्त संकटं का?
सीए करताना बऱ्याच अडचणी आल्या होत्या. संस्थेत असं वाटायचं आपल्याला आधार नाही. आपल्यालाच संकटं जास्त आहेत. आपल्यालाच नशिबात असं का, असे सारखं वाटायचं. पण सीए करताना क्षितिज या संस्थेने खूप मदत केली. काम करता करता मी एमबीए केलं. तेव्हा या संस्थेचे मला सहकार्य लाभलं. त्यानंतर पुन्हा सीएचा विचार आला होता. मात्र, फी मुळे अडचण येत होते. वडील चोरीच्या आरोपामुळे खचले होते. ते निघून गेले. ते बरोबर असल्याने आम्हाला जागाही कोण देत नव्हतं. त्यावेळी भाडं 20-25 रुपये असेल तरी तेही देणं जमत नव्हतं. पण अनेक अडचणींवर मात करत अखेर सीए झाले. एक मात्र यातून शिकले अशक्य असं काहीही नसतं. प्रामाणिक कष्ट हे तुम्ही केलेच पाहिजे. कष्टाला कोणताही शॉर्टकट नाही. त्याला दुसरा पर्यायही नाही. कोणतंही यश तुमच्यापासून दूर राहत नाही.