पुणे : सगळ्याच वयोगटात मोबाईल फोनचे क्रेझ आहे आणि त्याचाच परिणाम असा की सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच पुण्यात एका महिला खेळाडूची फसवणूक आणि अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय खेळाडू असलेल्या त्या तरुणीने टिंडर डेटिंग ॲपवर एका पन्नास वर्षीय व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यातूनच त्यांची मैत्री होऊन तिला वेगवेगळे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
पीडित तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसही या घटनेचा तपास करण्यात टाळा टाळ करत असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मी एक राष्ट्रीय खेळाडू असून मी स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत आहे. मी माझ्या फोनमध्ये डेटिंग अपलोड केले. आपल्या स्वतःच्या प्रोफाइलशी प्रोफाइल मॅच होतेय म्हणून मी एक रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर आमच्यात चॅटिंग सुरू झालं. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. एकमेकांना नंबर दिले, भेटीगाठी होऊ लागल्या, असं तिने सांगितलं.
पुढे त्या पीडित तरुणीला संबंधित व्यक्तीने वेगवेगळे आमिष दाखवून मुंबई आणि अन्य ठिकाणी तिच्या मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. असे अनेकदा आपल्यावर अत्याचार झाले. आपण ज्याला डेट करत आहोत तो ५० वर्षांचा पुरुष असून त्याचं लग्न झालं आहे. त्याला दोन मुलं आहेत. त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे, हे पीडित तरुणीच्या लक्षात आलं. या तरुणीने डेक्कन पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. आणि पोलीस तपास करत आहेत.