पुणे | युग डिजिटल झालं आणि अंतर कमी झालं. मात्र, याचे अनेक तोटे देखील वेळोवेळी समोर येत आहेत. सोशल माध्यमांचा गैरवापर अनेकदा होताना समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. इंस्टाग्राम वरून झालेल्या ओळखीची पुण्याच्या एका तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली आहे.
इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत गुजरातला नेऊन तिच्यावर अत्याचार केले. अखेर तरुणने तिथून स्वतःची सुटका करून घेत पुण्याला येऊन झाकीर इस्माईल झवेरीवाला ( वय 35, रा. गुजरात ) नामक तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 23 वर्षीय फिर्यादी तरुणी मूळची नेपाळची असून ती सध्या पुण्यात ढोले पाटील रोडवर वास्तव्यास आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाकीर आणि पीडिता यांची इंस्टाग्राम वर नोव्हेंबर 2021 मध्ये ओळख झाली. ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये बोलणं वाढू लागलं ओळखीच रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांची प्रत्यक्षात भेट झाली. भेटीनंतर झाकीरणे पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत गुजरात मधील बडोद्याला नेले. तेथे त्यांनी पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीने झाकीरला लग्नाबद्दल विचारले असता तो उडवा उडवी चे उत्तर देत असे.
याचवेळी पीडित तरुणीला झाकीरच अगोदरच लग्न झालेलं कळालं. त्यानंतर झाकीरने पीडित तरुणीला गुजरात मधील एका घरात डांबून ठेवत तिला एसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र एक दिवस झाकीर आपल्या पहिल्या पत्नीला भेटायला गेल्याने पीडित ने तिथून मोठ्या शिताफीने आपली सुटका केली आणि थेट पुणे गाठलं. मात्र झाकीरने वेगवेगळ्या फोन नंबर वरून तिला फोन करून ‘तू कुठेही गेलीस तरी तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. झाकीरच्या सारख्या धमक्याला घाबरून अखेर पीडितेने येरवडा पोलीस ठाण्यात झाकीरविरोधात फिर्याद दाखल केली. पीडीतीचा फिर्यादीनुसार झाकीरवर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलीस पुढील तपास करत असून आरोपीस अद्याप अटक झालेली नाही.