मुंबई | महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबईही गुजरातला देऊन टाकतील’, असे पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे.
दरम्यान, यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
शिंदे-फडणवीस महाराष्ट्रद्रोही
महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.