मुंबई | महाराष्ट्रातील प्रकल्प ज्याप्रमाणे गुजरातला जात आहेत, त्याचप्रमाणे गुजरातचा डोळा मुंबईवर आहे. उद्या मुंबई देखील गुजरातला देतील असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले यांनी केला आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार बरखास्त करावं या मागणीसाठी ते राज्यपालांना भेटणार आहेत अशी माहिती पटोले यांनी स्वतः दिली आहे. त्याचबरोबर या सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही नानांनी केला आहे.
महाराष्ट्राला उध्वस्त करणारे शिंदे-फडणवीस सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी केला. दिवाळीच्या शिधामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन करणार आहे.
राज्यात शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळत नसेल तर सरकार काय करत आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कित्येक दिवसांपासून शेतकरी मदतीविना असल्याने ते टोकाचे पाऊल उचलत आहे. यामुळे हे सरकार बरखास्त करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यसरकारवही सडकून टीका केली.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी-शाह यांनी ‘ईडी’चा वापर करून हे सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांचे सरकार आणले. राज्यात सरकार बदलल्यापासून केवळ तीन महिन्यांत वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प गुजरातला गेले. अशी नाना पटोलेंनी टीका देखील केली आहे.