मोरबी | गुजरातमधील मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल रविवारी सायंकाळी कोसळला. त्यामध्ये 140 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भाजप खासदार मोहन कुंदारिया (MP Mohanbhai Kundariya) यांच्या कुटुंबातील 12 लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने या खासदार कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मोरबी येथे मच्छू नदीवरील हा पूल सुमारे 100 वर्षांहून अधिक वर्षे जुना आहे. रविवारी सायंकाळी या पुलावर मोठी गर्दी झाली होती. क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने हा पूल कोसळला. या दुर्घटनेत 140 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून, बचावकार्यासाठी पथके दाखल झाली आहेत. मृतांमध्ये कुंदारिया यांच्या कुटुंबियांचाही समावेश आहे.
कुंदारिया यांच्या बहिणीच्या दीराच्या चार मुली आणि तीन जावई यांच्यासह पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुंदारिया रविवारपासून मोरबी येथेच तळ ठोकून बसले आहेत. या दु:खद घटनेनंतर कुंदारिया यांनी या पूल दुर्घटनेत दोषी आढळलेल्या कोणालाही सोडणार नाही, असे म्हटले आहे.