मुंबई | सध्या अनेक नव्या राजकीय घटना घडताना दिसून येत आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा नवाब मलिकांकडे वळवला आहे. जेलमध्ये असणाऱ्या नवाब मलिकांचीही कोट्यवधींची संपत्ती आता ईडी जप्त करणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सध्या कोठडीतच आहेत. या आधीही मलिकांची बरीच संपत्ती ईडीच्या ताब्यात आहे. मात्र आता ईडीकडून मलिकांच्या आणखी ८ मालमत्तांचा ताबा घेण्यात येणार आहे. यात कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड इथली मालमत्ता, उस्मानाबाद येथील १४७ एकर जमीन, मुंबईतल्या ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चौकशी सुरू आहे. फेब्रुवारीपासून ते ईडीच्या कोठडीमघ्ये आहेत. चौकशीदरम्यान, ईडीने सगळ्या संपत्तीची माहिती गोळा केली आहे. त्यानंतर आता ईडी कारवाई करत आहे. याविषयी ईडी कायदेशीर सल्ला घेत आहे. संपत्ती जप्त करण्यासाठी ईडीला परवानगी देखील मिळाली आहे. कायदेतज्ज्ञांच्या मदतीने पुढची कारवाई होणार आहे.