नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत निंबाळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
फुलगाव | विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयात असतानाच स्वप्न पाहिली पाहिजेत. ती उराशी बाळगून त्यांना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सध्याची युवा पिढी वेगळ्या वाटेवरून जात आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची नित्तांत आवश्यकता आहे, असे मत आसाम येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांनी व्यक्त केले.
लोकसेवा शैक्षणिक संकुल फुलगाव, पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षारंभानिमित्त आसाम येथे कार्यरत असणारे तडफदार आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भाषणाची सुरुवात प्रार्थनेने करतानाच प्रार्थना ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असून यशाच्या शिखरावर जाण्यासाठी ती उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांची मानसिकता ही वेगळ्या वळणावर जात आहे. ही मानसिकता योग्य वळणावर ठेवून यश कसे गाठावे. याविषयी निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमानंतर आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांना भेटण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली. त्यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. याप्रसंगी त्यांचे वडील चंद्रकांत निंबाळकर, जीवन विद्या मिशनच्या स्वाती संधांशी, रवींद्र गुरव, संचालक प्रा. नरहरी पाटील, सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, मुलींच्या शाळेच्या प्राचार्य लक्ष्मी कुलकर्णी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा मांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विकास तिरकुंडे, भारत पवार, तुषार वाघमारे यांनी केले.