पुणे : मार्केटयार्ड परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी गोळीबार करत 28 लाखांची रक्कम चोरून नेली असून, आरोपी फरार झाले आहेत. या घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, भरदिवसा हा गोळीबार झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मार्केटयार्ड परिसरात पी. एम. अंगडिया यांचे कुरिअर कार्यालय असल्याची माहिती आहे. याठिकाणी अचानक 4 ते 5 जण आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून गोळीबार केला आणि तब्बल 28 लाखांची रक्कम पळवून नेली. या घटनेची माहिती मार्केटयार्ड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, या गोळीबारात अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणाच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.