मुंबई | महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत अशातच आता नवा वाद होण्याचे संकेत दिसून येत आहेत. त्याच कारण म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करणार असल्याचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न अधिकच चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे वादग्रस्त विधान करून सीमाप्रश्न पुन्हा पेटवला आहे. बेळगावसह इतर मराठी भाषिक भाग आधीच बळकावून बसलेल्या कर्नाटकची वक्रदृष्टी आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर पडली आहे. जत तालुक्यामधील ४० गावांवर दावा करणार असल्याचे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. या ४० गावांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या ठरावाचा गांभीर्याने विचार करणार असल्याचे बोम्मई यांनी बंगळुरूमध्ये सांगितले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे विधान खोडसाळपणाचे आहे. तसेच जत तालुक्यातील गावांना कर्नाटकने पाणी दिल्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा खोटा आहे, असं विधान भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सीमाभागातील प्रश्नाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांची कोल्हापूरमध्ये बैठक झाली होती. तसेच सीमाप्रश्नाबाबत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची समन्वय समितीही राज्य सरकारकडून तयार करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नाबाबत सकारात्मक पावले उचलली जात असताना कर्नाटक सरकारने मात्र ४० गावांचा विषय उकरून काढत खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता राज्य सरकार कर्नाटकला काय प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.